Pages

December 14, 2012

आंदोलनाचा अपमृत्यू

चार दिवसांपूर्वी सकाळी ही अपमृत्यूची बातमी याच शीर्षकाखाली झळकली.अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन थांबवलं, ही लढाई आता राजकीय पातळीवर लढायचा त्यांच्या अनुयायांचा, इष्ट-मित्रांचा आग्रह त्यांनी मानला म्हणे.
ऐकून म्हण आठवली, ‘इतिहासाची परावृत्ती होते!’ आपल्या भारतीय परंपरेत म्हणजे इतिहास, पुराणे, महाकाव्ये, इतकेच काय अगदी लोकवाङ्‌मयातसुद्धा महापुरुषांच्या अनुयायांनी आपल्या गुरू, नेता वगैरेंची (आणि त्यांच्या तत्त्वांचीही) समाधी बांधलीय. 
राम, कृष्ण, बुद्ध-महावीर वगैरेंपासून अगदी गांधी-आंबेडकरांपर्यंत प्रत्येकाच्या बाबतीत हेच घडलेय. हे सारे शरीराने गेले. ते अपरिहार्य होते. पण ते नष्ट झाले नव्हते. मी तर म्हणेन ‘मरणाला मारून उरले’ असे त्यांच्याबाबतीत झालेय. पण त्यांचे अनुयायी जे काळाला जमलं नाही ते करून दाखवताहेत.
शिवाजी राजांचा कर्मयोग व माणुसकीचा ओलावा न समजलेले ब्रिगेडवाले अनुयायी त्यांच्या नावाला काळिमा लावण्यापलीकडे काय करताहेत? प्रेषितांच्या भाईचारा आणि माणुसकीच्या तत्त्वांना (निर्दोष माणसांची हत्या सर्व माणुसकीची हत्या होय- सूरह अल् मामता- सूर ३१.) दहशतवादात बुचकळून काढणारे दहशतवादी सद्धर्म बुडवत नाहीत?
महात्माजींनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या शस्त्रांनी स्वातंत्र्याची लढाई जिंकली. तीदेखील या सर्व संघर्षाला सत्याचं अधिष्ठान देऊन. मग आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत अनेकांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली. त्यांनीही आपापले संघर्ष जिंकले. माणसाच्या इतिहासातलं एक अभूतपूर्व आश्‍चर्य घडवलं ते या साध्या निःशस्त्र माणसानं. पण भारतात काय झालं?
गांधींचं समग्र तत्त्वज्ञान श्रेष्ठ होतं. ते समग्र स्वीकारून व्यवहारात आणणं म्हणजे सतीचं वाण होतं. त्यांच्या वारसांना ते झेपणारं नव्हतं, परवडणारं नव्हतं आणि आवडणारं तर नव्हतंच नव्हतं. त्यांच्या वारसांनी सरळ त्याचे दोन भाग केले. राजकीय आणि आध्यात्मिक. एका मार्गाने विनोबा, जयप्रकाश वगैरे गेले, दुसर्‍याने त्यांचे राजकीय वारस. परिणाम काय?
एक रुपया मध्ये फोडून (किंवा कापून) त्याची किंमत काय उरते? त्यांच्या राजकीय अनुयायांनी त्यांच जणू पेटंट घेतलं. झाला तोवर फायद्यासाठी (निवडणुकांत वगैरे) त्यांचा फायदा घेतला आणि नंतर.... आता स्वदेशी गांधींनंतर इटालियन गांधींपर्यंत आपण प्रगती करून आम्ही जागतिकीकरण करून घेतलंय. त्यामुळे सामान्यांचे ‘बापू’ आता बेरंग चौकटीतल्या विटक्या फोटोत घरोशांच्या संगतीत असतात. अर्थात ही आमच्या महापुरुषांची नव्हे तर करंटेपणामुळे करून घेतलेली आमची स्वतःची शोकांतिका आहे.
अशावेळी राजकीय पक्ष स्वैर आणि मोकाट सुटले. सत्ता भ्रष्ट करते, सर्वंकष सत्ता सर्वतोपरी भ्रष्ट करते हा सिद्धांत म्हणजे भीषण वास्तव झालं. इंदिराजींना भ्रष्टाचार हाच आजकाल शिष्टाचार झालाय हे जाहीरपणे मान्य करावे लागले.
एकीकडे भ्रष्टाचार, दुसरीकडे महागाई, तिसरीकडे दिशाहीन व धरसोडीच्या धोरणामुळे भरकटलेला विकास, बेकारी, शेजार्‍यांचा विश्‍वासघात व लादली गेलेली युद्धे आणि शस्त्रस्पर्धा... एक ना दोन! जनसामान्यांची अवस्था चक्रव्यूहातल्या अभिमन्यूप्रमाणे झाली होती.
अशा वेळी सुरेश भटांसारखा संवेदनशील कवी हाकारू लागला-
उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
अशांमध्ये अण्णा हजारे व त्यांच्यासारखे काही मोजके हाती पणती घेऊन या अंधाराशी झुंजत होते. तसे ते शिपाईगडी. पण त्यांनी गांधींपासून स्फूर्ती घेऊन ग्रामोदय वगैरे कार्यक्रम हाती घेतले. ते यशस्वी केले. मग माहितीचा अधिकार, भ्रष्टाचार वगैरे मुद्यांवरून राज्यसरकारशी दोन हात केले.
आपला संघर्ष कुणाशी, कशासाठी वगैरे सारी माहिती, त्याच्या छोट्या-मोठ्या चकमकींचा अनुभव इत्यादी गाठीशी बांधून अण्णा मोठ्या युद्धाला तयार झाले.
पहिल्या लढाईत माघार घेतली. कारण काय हवंय, हे राज्यकर्त्यांना, जनतेला आणि त्यांना स्वतःला स्पष्ट झाले होते. लोकजागृती हे महत्त्वाचे मूलभूत उद्दिष्ट उत्तम प्रकारे साध्य झाले. यात सर्वप्रकारच्या माध्यमांनी सहकार्य देऊन अण्णांना बळ पुरवले. महात्माजींनीदेखील इंग्रजांना अशी जागं होण्याची संधी दिली होती.
स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणावी अशी ही लोकपालासाठी सत्याग्रह व उपोषणाची पहिली लढाई सुरू झाली. आणि भारतच नव्हे तर सारे जग श्‍वास रोखून तिकडे पाहू लागले. भारतात रामायणानंतर प्रथमच माणसं दूरदर्शन संचाजवळ फार वेळ राहू लागली. सुन्न आणि निराश झालेलं जनमानस फुलारलं. युवाशक्तीला एक नवी विधायक दिशा सादावू लागली. अनेकांना गीतेतला ‘यदा यदा हि धर्मस्य’चा साक्षात्कार होऊ लागला.
महात्माजींनी आंदोलनात माघार घेतली ती पहिल्या संधीला आणखी चार पावलं पुढं जाण्याच्या योजनेनं! त्यामुळं त्या दृष्टीनं अण्णांचं पहिलं आंदोलन कल्पनातील यशस्वी झालं असं म्हणावं लागेल.
या आंदोलनाच्या वेळी बेदीबाईंच्या नकला, टीमवाल्यांची बेताल टिमटिम आणि प्रकाशात राहण्याचा हव्यास वगैरेंनी थोडा बेरंग झाला. तरी या नवशिकेपणातल्या चुका असे आम्हाला वाटले.
काही दिवसांत लोकपाल लढ्याचा दुसरा अध्याय सुरू होण्याचे नगारे वाजू लागले. कारण राजकारण्यांनी या ना त्या कारणाने प्रश्‍न कुजवत ठेवला. राजकारण्यांना तसं करणं भाग होतं. आपल्याच सावलीला भ्रष्टाचाराचा भस्मासुर पोसलेल्या राजकारण्यांना आता भस्मासुराला आवर घालणे शक्य आणि योग्य वाटत नव्हते किंवा परवडणारे नव्हते. त्यामुळे अनेक नाटके, कोलदांडे वगैरे प्रयोग झाले.
लोकपाल वगैरे सत्ताधारी पक्षाला नको होते. कारण त्यांना त्यापासून होणार्‍या नुकसानीचा नेमका अंदाज होता आणि विरोधी पक्षांनी कर्नाटकमध्ये तो प्रयोग करून हात पोळून घेतले होते. त्यामुळे नवा लोकपाल आणण्याच्या प्रयोगाचा पद्धतशीर विचका करण्यात आला.
भारतीय लोकशाहीला लोकशाहीचे मूलभूत दुर्गुण तर आहेतच, वर स्वतःचे परंपरा, वृत्ती-प्रवृत्तीने निर्माण झालेले नवे दुर्गुण आहेत. कोणतीही गोष्ट मोठ्या गाजावाजाने सुरू करून मग मध्येच अवसान संपते. म्हणजे थोडक्यात ‘आरंभ शूराः खलु भारतीयः|’
गांधीजींना आपल्या निश्‍चित उद्दिष्टांची जाणीव आणि ती मिळवण्याचा मार्ग यांची स्पष्ट जाणीव होती. ऍनी बेझंटपासून लाल, बाल, पाल यांच्यापर्यंत त्यांच्या लढ्यासाठी मानसिक- बौद्धिक मार्ग पूर्वसुरींनी तयार केलेला होता. पण गांधींनी त्याला वेगळी आणि अभिनव कलाटणी दिली. देश-विदेशातील पढीक राजकीय पंडितांनाच नव्हे तर चर्चिलसारख्या अनुभवी राजकारण्यालासुद्धा धोबीपछाड दिली. अर्थात स्वभावधर्माप्रमाणे इंग्रजांनी भावी काळासाठी दुही व द्वेषाची पाचर मारून ठेवली.
अण्णांना गांधींचा हा मार्ग तयार होता. खडतर पण यशाची खात्री असणारा हा मार्ग त्यांनी निवडला यातच खरं तर यशाची अर्धी वाटचाल झाली होती. जनता, युवाशक्ती, प्रसारमाध्यमे वगैरे सारे पाठीशी होते. पण तरीदेखील दुसर्‍या अंकातच सार्‍या नाटकाचा फज्जा उडाला. असे का व्हावे?
पहिली गोष्ट ही की गांधींच्या सत्याग्रह मार्गाची सर्वसामान्य किंवा ढोबळ माहिती अबाल वृद्धांना आहे, पण त्याचं अचूक शास्त्रीय अध्ययन, त्याचा आपण करायचा उपयोग, त्याविषयी येणार्‍या अडचणी व त्यावरील संभाव्य उपाय यांवर विचारमंथन झाले होते काय? तसे टीम अण्णांचे पोरकट वागणे आणि आचरट शेरेबाजी पाहता झाले असेल असे दिसत नाही.
टीम अण्णांना ‘टीम’ या शब्दाचा अर्थ नीटपणे समजला आहे का याविषयी शंका आहे. एकोपा, विवेक, संयम, एक नेतृत्वाला संपूर्ण मान्यता वगैरे गोष्टी ‘टीम’ होण्याला गरजेच्या असतात. प्रत्येकजण स्वयंभू आणि स्वतंत्र नेता होता. खरं तर नेत्यांचं असलं अमाप पीक हे भारतीय लोकशाहीच्या शोकांतिकेचं एक कारण आहे. सारेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे... सच्चा अनुयायांची वाण हा भारतीय राजकारणाला स्वातंत्र्योत्तर काळात लाभलेला शापच आहे. थोड्याशा प्रसिद्धीने, मान्यतेने आमच्या डोक्यात हवा जाते. आपण वाहवत जातो. पहिल्या उपोषण काळातील टीममधल्या लोकांच्या (बेदीबाई वगैरे) नकला, प्रहसने याला साक्ष आहेत.
अशा अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणार्‍या कवी-लेखकांविषयी प्रसिद्ध शायर अकबर इलाहाबादी म्हणतात-
दो किताबें पढ लिए, और शायरी करने लगे|
खेत को अपना समझकर, ये गधे चरने लगे॥
जी गोष्ट साहित्यिकांना लागू आहे ती राजकारण्यांनाही आहेच. आपल्याकडे राजकारणी वारशाने येतात, समाजकारणाच्या मुशीतून तावून-सुलाखून येत नाहीत. बहुतेक सारे पोटार्थी नोकरपेशे. त्यामुळे टीम अण्णाला आपले नेतृत्व परप्रकाशित आहे याची कल्पनाच आली नाही.
अण्णा हजारे हे स्वतः फौजी आहेत. सरळ, साधे आणि भावलेले तत्त्वज्ञान जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणारे गृहस्थ. ना त्यांचा राजकारणाचा अभ्यास आहे, ना त्यासाठी लागणारे गुण (?) त्यांच्याकडे आहेत. राजकारणी तो, ज्याने रात्री चुकून खिळा गिळला तर दुसर्‍या दिवशी बुचे उघडणार्‍या कॉर्कस्क्रूच्या अवस्थेत तो खिळा मिळेल याबाबतीत अण्णा अज्ञानी.
स्वच्छपणे आंदोलन न व्हावे, त्यांना राजकारणाच्या दलदलीत ओढावे म्हणून अनेक नेते देव पाण्यात बुडवून बसले होते. कारण या खास त्यांच्या आखाड्यात, त्यांनीच निर्माण केलेल्या नियमांनी राजकारणी (पक्ष) टीमलाच काय खुद्द अण्णांनाही धोबीपछाड देऊ शकतात.
गेल्या साठ वर्षांत आयुष्यातली मूल्येच नष्ट झालीत, ती राजकारणात कशी व कुठून येणार? लोकशिक्षण होऊ नये, जात, धर्म, पंत, भाषा, पाणीप्रश्‍न, सीमा प्रश्‍न इ. राष्ट्रीय प्रश्‍न निर्माण करणे व ते कुजवणे, प्रत्येक वेळी फोडा आणि झोडा याच ब्रिटिश नीतीचा उपयोग, लोकशिक्षण व सर्वसामान्य शिक्षणात संस्कारांना फाटा, लोकांचेच त्यांचेच त्यांना देऊन लोकांत उपकृत झाल्याची भावना व मिंधेपण वाढीस लावणे... असे अनेक उपाय करून राजकारण केवळ निवडणुका व सत्ता यांच्या भोवती फिरत ठेवले, यामुळे सध्याच्या राजकारण्यांशी झुंजणे अशक्य नसले तरी अशक्यप्राय आहे. त्यात सत्ता आणि मत्ता यांची अभद्र युती आहेच.
अण्णांनी भरकटावे, त्यांचा तोल सुटावा म्हणून सत्तारूढ पक्षाचे काही खास लोक दोन्ही आंदोलनांच्या वेळी बेताल बडबड करीत होते. प्रत्येक पक्षात, प्रत्येक काळात असे लोक पदरी बाळगले जात. पूर्वीच्या काळी राजेलोक आपल्या प्रतिस्पर्ध्यांना अपशकून करण्यासाठी सांभाळले जात. इंदिरा गांधींच्या काळात त्यांना ‘शाउटिंग ब्रिगेड’ म्हटले जायचे. कॉंग्रेसमध्ये एक माजी मुख्यमंत्री फक्त तेवढेच काम करतात. त्याशिवाय मित्रपक्षाचे तर अनेक आहेत. ते सारे या दोन्ही आंदोलनांत आपापल्या भूमिका चोख बजावत होते.
दुसरे आंदोलन सुरू झाले. वातावरण तापू लागले. लोकमानस जागे होऊ लागले. आठनऊ दिवस झाले आणि कुठेतरी माशी शिंकली. कुणीतरी राजकारणातून म्हणजे मतपेटीतून या सुधारणा करण्याची टूम काढली. बुडत्याला काडीचा आधार तशी ‘टीम’ने ती कल्पना स्वीकारली. याला स्वतःच्या कुवतीविषयी, लोकमानसातील आपल्या स्थानाविषयी अवास्तव कल्पना कारणीभूत असाव्या.
शहीद होण्याची भाषा काही टीम सदस्यांनी केली होती. ‘इस पार या उस पार’ची भाषा खुद्द अण्णांनी केली होती. पण या आकस्मिक आणि अवसानघातकी निर्णयामुळे त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झालेली नाही काय? मला स्वतःला वाटतं, पूर्णनियोजन, भावी रणनीतीची आखणी, सर्वांनी विचार करून फक्त एकानेच बाहेर बोलावे वगैरे ठरवणे आवश्यक होते. कार्यापेक्षा कारभारी जास्त झाले. मुहूर्तही चुकीचा होता.
कुठलंही आंदोलन म्हणजे वाघाला हाका घालण्यासारखे असते. केव्हा शिकारीसाठी रान उठवावे याचेही एक शास्त्र आहे. तसेच आंदोलन केव्हा करावे, कसे करावे, दबावतंत्र कसे वापरावे याचेही आडाखे आहेत. ते समजून, पुढच्या परिस्थितीचा विचार करून वापरायचे ते शस्त्र आहे. पण दोन्ही वेळा याचा सर्वांगी विचार झाल्याचे दिसत नाही. या सगळ्यामुळे आंदोलन भरकटले आणि खुद्द अण्णांची फरपट झाली असे मला वाटते.
जनतेतील काही लोक भडकले. त्यांनी आपला राग व्यक्तही केला. कारण एक आशेचा किरण दिसला, अपेक्षा वाढल्या आणि मग... अनपेक्षित धक्क्याचे, निराशा आणि वैफल्याचे असे काही थोडे परिणाम तर अपरिहार्यच आहेत. सध्या जनतेची मानसिक स्थिती कशी होती याची चुणूक उत्तर प्रदेश निवडणुकीत दिसली. स्वतःच्या गृहराज्यात सत्तारूढ पक्षांची (केंद्र व राज्यात) वस्त्रे उतरवली. निवडलेला पर्याय किती योग्य हा वादाचा विषय होईल. पण लोकांना आणखी पर्याय तरी कोणता होता?
आंदोलन लांबले असते, तर... तरी कुणाचाही बळी गेला नसता. कारण लोकपाल कितीही नकोसा असता, तरी स्वतः नामशेष होण्याचा धोका सत्तारूढ राजकारण्यांनी कधीच पत्करला नसता. बलिदानाची भाषा करणारे टीमवाले समोर मृत्यूचा कराल जबडा दिसताच माघारी आले ही जनतेची भावना तुम्ही कशी नाहीशी करणार?
‘टीम अण्णा’ने आता काही केले तरी ‘बूँद से गयी’ यात शंकाच नाही. लोकांच्या आशा पालवल्या, अनेकांनी पुढच्या क्षणी आपण सहभाग घ्यायची तयारी केली. अशावेळी अचानक घेतलेली माघार लोकमानसात काय संदेश देईल? टीम भ्याली, मरण पाहून माघार घेतली असे वाटले नसेल?
आंदोलन थांबलं, थांबू दे. पण म्हातारी मेल्याच्या दुःखापेक्षा ‘काळ’ सोकावण्याचे भय अधिक आहे. यापुढे लोक अशा आंदोलनांवर आणि आंदोलकांवर विश्‍वास ठेवतील काय हा कळीचा प्रश्‍न आहे.
शिमगा संपला तरी कवित्व सुरू असते, तसे या प्रकरणात सुरू झालेय. पूर्वी ज्यांची ब्र काढण्याची हिंमत नव्हती त्यांचे शेरे-ताशेरे झडू लागलेत. पडल्या योद्ध्यावर घाव घालण्याची रीत राजकारणात आहे. कारण तेही एक युद्धच. आता अण्णांनी एकांती मौनात बसून आत्मचिंतन करावे. या सर्व प्रकरणात नेमके कसे, कुठे व आपले का बिघडले याचा आढावा घ्यावा. चुका जर दिसल्या तर प्रांजळपणे जनतेपुढे मांडाव्या. पुढची दिशा (नाही तर होणारी दशा) सांगावी. नाहीतर... दुसरे जयप्रकाश म्हणूनसुद्धा इतिहास दखल घेणार नाही.

5 comments:

  1. Shalmali Shantanu GokhaleDecember 14, 2012 at 10:25 PM

    गांधींची आंदोलनं ,तो काळ आणि आंदोलनांची कारणं ,पार्श्वभूमी हे आपणच समग्र लिहिलं आहे. जनाधार प्राप्त झाला त्याचा हेतू आणि प्रामाणिकपणा ह्यात कुठेही शंकेला स्थान नव्हते. टीम अण्णा , त्यांची वेळोवेळी बदलत गेलेली कार्यप्रणाली आणि एकूणच बऱ्याचदा उठलेली राळ सामान्य मनुष्याला आंदोलनापासून लांब घेऊन गेले. सरकारी यंत्रणा , ती सुद्धा संपूर्ण स्वातंत्र्य असलेल्या देशातील, ह्या आंदोलनाच्या विरोधात होती. सामोपचाराचे देखावे निर्माण केले गेले. घडलं काहीच नाही. आरटीआय हा भस्मासूर ठरतो की काय अश्या पद्धतीने एग्झीक्युट होऊ लागला. ह्या आंदोलनाबद्दलची सहानुभूती गमावणं हा फार मोठा विशेष होता. अत्यंत वाचनीय लेख शरद जी. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. अत्यंत वाचनीय आणि मननीय लेख!

    ReplyDelete
  3. mahatma gandhinche mahanpan tyanchya achar ani vichar suchitet hote.te gandhi topi ghatlyamule milnar hote ka?tyasathi vartan suchita avshyak hoti.mediane chadhavile ani annancha tol gela.annana manase rakhata yet nahit.yevhadhe mothe kaary ektyachya himativar tadis nyayala ti kaay ralegansiddhhi ahe?tethech tyani maar khalla .pan samanya janateche matr faar mothe nuksan zale.

    ReplyDelete
  4. सर फार सुंदर आणि सर्वांगीण विचार करून लिहिलेला लेख आहे !! आणि तुम्ही दिलेल्या उपमा तर एकदम फर्स्ट क्लास !!! विशेषतः राजकारण्यांनी चुकून खिळा गिळला तर ....आणि स्वदेशी गांधीनंतर इटालियन गांधी एकदम मस्त !!! पण सर खर सांगा जयप्रकाशजी, मदन मोहन मालविय ह्यांच्या पिढी नंतरच्या पिढीत द्रष्टा म्हणावा, खरे नेतृत्व गुण असलेला एकाही नेता निपजू नये ???? ह्याला दुर्दैव म्हणू की आणखी काही ??? की आमचेही काही चुकते आहे ??? खूप चर्चा करावी असा आणि त्यातून काही घ्यावे असा विषय आहे ... ह्यावर अजून बोलुयात ... बोलत राहा...

    ReplyDelete
  5. I have read the article carefully. I feel that there is a need to get away from the modes of applications of the names of lables of the legendary leaders and copying the versions of actions made by them by the society which aspires for the attainment of +ve change. The sustainable property of evolution is 'change' that resolves a change. There is also a need to develop a psyche of the society in the form of tremendously elevated self discipline and faith on the self culture of civic discipline, before resorting to the matters of a trial and tests of the evolving pattern of change. .... Nice article and I have many a suggestions which I will post on my page for the benifit of the fellow men...

    ReplyDelete