परवा गांधी जयंती. गांधी जयंती म्हटल्यावर कोणता गांधी म्हणून अनेकांच्या भुवया उंचावतील. जागतिकीकरणाच्या वेड्या उत्साहात गांधींचेसुद्धा आपण जागतिकीकरण केल्याने असा गोंधळ होणे साहजिक आहे. मी म्हणतो ते गांधी म्हणजे ज्यांचा आपण ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरव करतो ते मोहनदास करमचंद गांधी.
नाव ऐकल्यावर दुसरा प्रश्न तुमच्या मनी येईल- आता त्यांचं काय? या वेगवान जेट युगात गांधी तत्त्वज्ञानाची बैलगाडी कशी उपयोगी पडेल? या भारतात एखादा कोट्यवधींचा बंगला स्वतःसाठी उठवतो, तर दुसरीकडे हजारो लोकांना अद्याप पाय लांब करून झोपण्याइतकी जागा नाही. एकीकडे साठवणीसाठी सोयी साठ वर्षांत न केल्याने धान्य कुजते, तर दुसरीकडे अनेक बालके कुपोषणाने मरताहेत. भारतातले विषमता, विसंगती आणि विसंवादाचे युग अद्यापही संपलेले नाही. शेकडो वर्षांच्या गुलामीमुळे अंगी भिनलेली लाचारी, दैववाद आणि प्रत्येक जबाबदारीपासून पळपुटेपणा गेल्या साठ वर्षांत उणावलेला नाही. त्यामुळे गांधी आणि गांधी विचारधारेची पुनर्तपासणी करावी हे अपरिहार्य कर्तव्य प्रत्येक भारतीयाचे झाले आहे.
महात्मा गांधी, जनसामान्यांचे एके काळचे लाडके बापू, राष्ट्रपिता आज नावापुरतेसुद्धा उरलेले नाहीत. आज विद्यार्थी पाचपंचवीस मार्कांसाठी नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासतो. त्यात पाच-दहा मार्काचे गांधी (चूकभूल देणे-घेणे) असतात. राष्ट्राच्या, समाजाच्या आणि व्यक्तीच्याही बाबतीत चुकीचं मूल्यमापन किंवा अवमूल्यन हा भारतीयांचा परंपरागत करंटेपणा आहे; आणि तो प्रत्येक महामानवाच्या बाबतीत आपण बिनचूक केला आहे. जे भूतकाळ विसरतात त्यांना भविष्यकाळ नसतो दे दाहक सत्य आपण विसरतो (तेही वारंवार ठोकर खाऊन). त्याहून वाईट म्हणजे योग्य व आवश्यक ते ठोकरून अयोग्य आणि अनावश्यक ते ऊरी कवटाळतो आहोत.
भारत हा विसंगतींचा देश आहे. आदर्शांची प्रतीकं करून करून आम्ही ती पुजतो. पण त्या आदर्शांना आचरत नाही. त्यांना आपल्या रोजच्या आयुष्याबाहेर ठेवतो. आदर्शांची अशी विटंबना ही आमची अनेक शतकांची साधना आहे. आपल्या बुद्धी आणि समृद्धीच्या दैवता या स्त्रिया आहेत. एकीकडे त्यांची भक्ती व जागर करणारे आम्ही, आणि स्त्रीभ्रूण हत्येचे गुन्हेगारही आम्हीच. मूल्यांचा जसा आणि जेवढा घोष आम्ही करतो त्याच्या पाव हिश्शाने अमलात आणली असती तर आज भारत कुठल्या कुठे असता!
या विसंगतीचे भान असणारा, ती समजून घेऊन स्थल-काल व प्रसंग सापेक्ष विचार करून मार्ग शोधणारा, तसेच सामान्य जनांना आचरणातून प्रेरणा देणारा नेता म्हणून गांधीजी आजही जगमान्य आहेत- भारत विसरला तरी. कृष्णानंतरचा खरा कर्मयोगी नेता म्हणून गांधींचे नाव घ्यावे लागेल. मूल्यांचा उद्घोष, त्यावर प्रवचने त्यांनी केली नाहीत. स्वतःच्या आचरणातून सारे कसे साधे आणि सोपे करून दाखवले. एवढा मोठा स्वातंत्र्यलढा त्यांनी लोकजीवनाचे अंग बनवला.
एका उर्दू शायरानं म्हटलंय-
‘खुदी को कर बुलंद (श्रेष्ठ) इतना,
कि खुदा बंदे से पूछे, तेरी रजा (इच्छा) क्या है?’
गांधीजींनी स्वातंत्र्याच्या संग्रामात सामान्य माणसाला वृत्तीनं आणि कृृतीनं असं बुलंद व बलदंड बनवलं. मनात हिंमत आणि मनगटात ताकद भरली. लोकांना आत्मभान देऊन संगठीत आणि समर्थ बनवलं- आणि तिथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकली.
जगात एक सार्वत्रिक गैरसमज आहे की म. गांधींनी निःशस्त्र लढा देऊन स्वातंत्र्य मिळवलं. ही समजूत साफ चूक आहे. स्वातंत्र्य हे भीक मागून मिळणारी गोष्ट नव्हे; आणि गांधींनीही ते रणाविना मिळवलेले नाही. फक्त त्यांची शस्त्रे अभिनव आणि व्यूहरचना (रणनीती) अभूतपूर्व होती.
गांधींनी या युद्धात वापरलेली तीन शस्त्रे म्हणजे झाडू, चरखा आणि सत्याग्रह- सत्याचा निर्भय आग्रह. गांधींना केवळ परकी सत्तेशी लढायचे नव्हते; बाह्य आणि अंतर्गत शत्रूशी लढायचे होते. अंतर्गत शत्रू इंग्रजांपेक्षा अधिक भयंकर होते. ते म्हणजे जातीपाती, भाषा, अंधश्रद्धा वगैरेंमुळे विभागलेला समाज, दैववाद, त्यातून उपजलेला आळस, परसत्ता व सरंजामशाही ते बाणवलेली लाचारी, इंग्रजांनी रुजवलेली थ्री बिजे (बायबिंग, बूट लिकिंग आणि बॅक बायटिंग) इत्यादी. गांधींनी आपली शस्त्रे दुहेरी मार्यासाठी वापरली.
झाडू हा सार्वजनिक स्वच्छतेसाठी होता तसाच तो मनावरची जळमटे झाडण्यासाठीदेखील होता. मोठेपणाचा खोटा अहंकार, सामाजिक विषमता- मग ती जन्माने, कर्माने किंवा आर्थिक परिस्थितीने आलेली असो- झाडून टाकण्यासाठी होता. या गोष्टींसाठी या शस्त्राचा किती व कसा उपयोग झाला याला इतिहास साक्षी आहे.
दुसरं शस्त्र चरखा. याचं उद्दिष्टदेखील दुहेरी होतं. एकीकडे आपल्या बांधवांना श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व समजावणं आणि स्वदेशीची भावना जागवणं होतं, तर दुसरीकडे परकी सत्तेचं अर्थकारण खिळखिळं करणं होतं. सामान्य लोकांना उद्योगीपणा, स्वावलंबन शिकवलंच- वर आत्मसन्मान दिला. या चरख्यानं मँचेस्टरच्या गिरण्यांची चाके काही काळ बंद पाडली होती हे ऐतिहासिक सत्य आहे. एखाद्या चळवळीतील शस्त्राचे रूपांतर जीवनधारणेत करण्याचे अशक्यप्राय काम कृष्ण, बुद्धादी ज्या मोजक्या महामानवांना जमलं त्यांच्या पंक्तीत त्यांनीही मानाचं पान मिळवलं.
गांधींचं तिसरं शस्त्र होतं सत्याग्रह. पण कसा? अहिंसकपणे केलेला सत्याचा आग्रह. यासाठी लागणारी अहिंसा बुळग्या नेभळटांची नव्हती, तर विलक्षण मनोनिग्रह आणि आत्मतेजाचं बळ असणार्या योग्याची होती. असा शक्तीचा प्रवाह त्यांनी साध्या, सामान्य माणसांत निर्माण केला. त्यामुळे परदेशी मालाच्या गाड्यांना आडवं पडून अडवण्याचं आणि प्राण देण्याचं बळ बाबू गेनूसारख्या साध्या, पोटासाठी राबणार्या एका हमालात आलं. किंवा पडणारा झेंडा सावरून तिरंगा उंचावून छातीवर गोळ्या झेलणार्या बारा-चौदा वर्षांच्या शिरीष कुमारमध्ये आलं.
हे बळ, ही ऊर्मी नंतर टिकवली गेली नाही खरी, त्याला आपली आरंभशूर वृत्ती, करंटेपणा, आपली व नेत्यांची स्वार्थी वृत्ती वगैरे अनेक कारणे आहेत. पण स्वातंत्र्यलढ्याची पूर्तता होईतो, म्हणजे गांधीजी जिवंत असेतो ती भावना जागृत होती. म्हणूनच त्यांनी ‘नंगा फकीर’ म्हणून हिणवणार्या उन्मत्त चर्चिलच्या हयातीतच साम्राज्याचे तुकडे करून व स्वातंत्र्य मिळवून दाखवले. साम्राज्यशाही वृत्तीलाच नंगे केले.
त्यांच्या एवढ्याशा दिसणार्या कृश शरीरात ऊर्जा तरी किती...? स्वातंत्र्यलढा, त्याची व्यूहरचना, वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्ती आणि संस्कृती असलेली माणसे एकोप्याने कामाला लावणे, योग्य माणसाची योजना योग्य कामासाठी करणे, सामाजिक विषमतेविरुद्ध- मग ती धार्मिक असो की आर्थिक असो- लढा देणे, दोन साप्ताहिकांचं काम सांभाळून सार्या भारतभरातून येणारा पत्रव्यवहार सांभाळणे, लोकांच्या भेटीगाठी, बैठका, सभा, दौरे वगैरे कितीतरी कामे त्यांनी सांभाळली. (या पार्श्वभूमीवर आजकाल मंत्र्यांना आपले खाते (म्हणजे डिपार्टमेंट या अर्थी बरं का!) धड सांभाळता येत नाही हे विदारक सत्य आहे.) सारे त्यांनी सांभाळले. आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर देण्याचे आणि त्यात दोन अक्षरे ‘बापू के आशीर्वाद’ एवढे तरी लिहिण्याचे व्रत त्यांनी पाळले.
एवढ्या व्यापाला लागणारी ऊर्जा त्यांना कुठून मिळत होती. मला वाटतं भारतीय संकल्पनेतील ईश्वर किंवा पाश्चात्त्य संकल्पनेतील कॉसमॉस एनर्जी (वैश्विक ऊर्जास्रोत) त्यांना शक्तीपुरवठा करत असेल. त्या दृष्टीनं पाहिलं तर ‘यदायदाहि धर्मस्य’ या वचनाची सत्यता पटते. समाज आणि माणुसकी यांच्यासाठी काम करणार्या सर्वच नरश्रेष्ठांकडे अशी अफाट ऊर्जा असल्याचे दिसते.
गांधीवाद हा जुना, कालबाह्य आणि निरुपयोगी झाल्याचं सांगितलं जातं. मोडीत निघालेल्या साम्यवादाचं उदाहरण दिलं जातं. चुकीच्या गृहीतकावर काढलेला हा चुकीचा निष्कर्ष आहे. पहिली गोष्ट कोणतीही तत्त्वं माणुसकीच्या पायावर उभी असली तर कधीही नष्ट किंवा अपयशी होत नाहीत. गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्हींच्या मुळाशी समाजातील उपेक्षित व शोषितांविषयी करुणाच आहे. समानतेची आस्था आहे. पण साध्य समान असले तरी ते मिळवण्याच्या मार्गाबाबत जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
भारतीय जीवनधारणेच्या संस्कारांमुळे गांधी व्यक्तिविकासातून समाजपरिवर्तनाचा विचार करत होते, तर मार्क्स व एंजल्स यांनी समाजाचा घाऊक विकास झाला तर व्यक्तिविकास आपोआप होईल असे मानले. ध्येय साध्य करताना व्यक्तीला वेगळे महत्त्व नाही, वाटचालीत काही व्यक्ती चिरडल्या गेल्या तर ते क्षम्य व अपरिहार्य आहे असे ते मानत होते.
पौर्वात्य आणि पाश्चात्त्य विचारसरणीतला हा फरक आहे. आत्यंतिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या भूमीत अशा अनेक विचारधारा निर्माण झाल्या. फॅसिझम वगैरे चुकीच्या ध्येयामुळे नष्ट झाला, तर कम्युनिझम चुकीच्या मार्गामुळे झाकोळला. ध्येयाला महत्त्व देऊन ध्येयाच्या मार्गाला गौण मानणारे सारे संप्रदाय- मग ते चांगले-वाईट कसेही असोत- ते टिकत नाहीत हेच इतिहास सांगतो. मग गांधीवादाचे काय?
पहिली गोष्ट, भारतीय परंपरेत सांगितलेली, मूळ मानवतावादी भारतीय संस्कृतीने मान्यता दिेलेली ध्येयेच मार्गासह गांधींनी स्वीकारली. स्थळ-काल-स्थितीप्रमाणे काही आवश्यक बदल करून गांधींनी स्वीकारले. यांत बुद्धीची ‘करुणा’ होती, महावीरांची अहिंसा होती, पैगंबरांचा ‘भाईचारा’ होता आणि कृष्णाचा कर्मवादही होता. पण नव्हता तो कर्मठपणा. गांधी‘वाद’ हा काही वेगळा आणि अभिनव प्रकार नव्हता. मूळ मानवतावादाला घासूनपुसून, सामान्यांना समजेल व आचरता येईल अशा सोप्या व सहज रूपात त्यांनी मांडला.
त्याचे सिद्धांत अवास्तव, कालबाह्य किंवा अभारतीय नाहीत. अन्यथा ओबामा राष्ट्रपती झाले नसते, इजिप्तमध्ये सत्तापालट झाला नसता किंवा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला तरुणांचा एवढा पाठिंबा मिळाला नसता. फार कशाला, परवा केजरीवालांच्या आंदोलनालासुद्धा एवढा प्रतिसाद मिळाला नसता. भाडोत्री माणसे आणून केलेला तो राजकीय स्टंट वाटत नव्हता. म्हणजे गांधीवादात काही उणीव नाही, तर वापर करणार्या माणसांत ती आहे.
गांधींच्या अनेक योजना आज पुन्हा सरकारे अमलात आणत आहेत. ग्रामस्वराज्याची कल्पना ग्रामोदय झाली. एकीच्या प्रयत्नांना तंटामुक्तीचे लेबल मिळाले. पाणी अडवा पाणी जिरवामधून स्वावलंबनाचे ध्येये दिले जाऊ लागले. गांधींच्या दारूबंदीला सुरुंग लावणार्या कॉंग्रेसच्या राज्यात आठवी-नववीची साताठशे कोवळी मुले दारूने धुंद झालेली आढळली. ही प्रगती असेल तर गांधी नक्कीच प्रतिगामी असणार.
गांधींच्या धर्मविषयक विचारांविषयी असेच गैरसमज आहेत. नसते तर सार्याच धर्मांच्या कट्टरवाद्यांना गांधी आपल्या धर्माविरुद्ध आहेत असे वाटले नसते. त्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली हा आणखी एक गैरसमज. त्यामुळे त्यांची हत्या झाली. पण हे असत्य असल्याचे संशोधन करून श्री. शेषराव मोरे यांनी विचार मांडले आहे. पाकिस्तानला कबूल केलेले पंचावन्न कोटी देण्याचा त्यांचा आग्रह राष्ट्रीय चारित्र्याशी संबंधित होता. दिलेलं वचन पाळणे राष्ट्रीय चारित्र्यसंवर्धनासाठी आवश्यक होते. काश्मीर आक्रमण किंवा जातीय दंगलीशी त्याचा संबंध जोडणे त्यांना मान्य नव्हते.
काश्मीर आक्रमणाला जशास तसे उत्तर द्यावे असे स्पष्ट शब्दांत त्यांनी ‘हरिजन’ साप्ताहिकातून म्हटले होते. त्यांची ‘अहिंसा’ नेभळ्या हाडग्यांची अहिंसा नव्हती. असे असताना त्यांच्या लाडक्या शिष्यांनी प्रश्न जागतिक व्यासपीठावर नेऊन त्याचा विचका केला हे ऐतिहासिक सत्य नाही?
गांधीजींचा धर्म शंभर टक्के मानवताधर्म होता. पण स्थल-काल-परिस्थितीची बंधने सर्वच महामानवांना पाळावी लागली आहेत. मग तो बुद्ध असो की पैगंबर असोत- सत्य आणि समता हा मानवधर्माचा पाया- तोच गांधींचा धर्म होता. पण मुख्य कार्य व ध्येय स्वातंत्र्यप्राप्ती हे होते. धर्मविचार गौण होता. कारण परस्परविरोधी विचारधारेच्या, अंधश्रद्ध, परंपरावादी वगैरे जनतेला त्यांना बरोबर घेऊन जायचे होते.
त्यांनी जाती निर्मूलन, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न केले, पण मुख्य उद्देशाला पूरक होतील इतपतच ती मर्यादा पाळणे त्यांना अपरिहार्य होते. त्यांच्या गोवंश संरक्षणाच्या मागणीची त्यांच्या हिंदुत्वाच्या ओढ्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांचे काही टीकाकार करतात. पण तो विचार त्यांच्या ग्रामस्वराज्याच्या, स्वावलंबनाच्या आणि आर्थिक उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून मांडला गेला होता. (भारतीय गोवंशाच्या उपयुक्ततेविषयी आजकाल माध्यमांतून वैज्ञानिक संशोधनासह बरेचसे येते आहे.)
ज्या गोष्टींचा त्यांनी पुरस्कार केला त्यांना भारतीय संस्कृती, परंपरा वगैरेंमध्ये प्राधान्य होते हे खरे पण त्या मूळ मानवतेशीच संबंधित होत्या. त्यातच त्यांच्यावरील संस्कारही तेच होते. प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून पाहतो आणि मग ती वस्तूही त्याला तशी त्या रंगाची दिसते. गांधी आणि त्यांच्याविषयीच्या टीका या हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीचे प्रत्यंतर देणार्याच आहेत.
गांधींचं समाजकारण, राजकारण, इतकंच त्यांचं अर्थकारणही वादाचा विषय झालंय. ते जुनाट आहे, विज्ञानयुगात देशाच्या प्रगतीला मारक आहे, जागतिकीकरणाच्या रेट्यात तर ते पूर्ण निरुपयोगी आहे वगैरे पुस्तकी पंडित सांगतात.
जागतिकीकरणाचे आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे ढोल बडवणारे जसे गांधींच्या अर्थव्यवस्थेविषयी नाराज आहेत, तसेच साम्यवादी आणि ‘स’ नसलेले तथाकथित समाजवादीदेखील याचे कडवे टीकाकार आहेत. कारण सामाजिक बदल वा आर्थिक परिवर्तन त्यांच्या अपेक्षेइतक्या झपाट्याने होत नाही. जे सत्त्वर निर्माण होते ते तेवढ्याच जलद नष्ट होते, हा सृष्टीचा नियम आहे.
गेल्या तेरा वर्षांत एक पढीक अर्थशास्त्रज्ञ मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रयोग देशात राबवत आहे. पण फलित काय?
दारिद्य्ररेषेखालच्या संख्येत घट नाही, वाढत्या लोकसंख्येतील तरुण हातांना देण्यास काम नाही, विकास दरात वाढ नाही; आणि घट नाही ती महागाईत. असं का व्हावं? भारतीय अर्थव्यवस्था मुंगीच्या पावलाने पुढे सरकल्याचा भास होतो तोच मुंगळ्याच्या गतीने मागे येतेय! मग देशाची अर्थव्यवस्था सुधारते आहे हा निष्कर्ष कशावरून? कोकाकोलाचा खप आणि मॅक्डोनाल्स व पिझ्झा हट्स वाढताहेत म्हणून का? भारताच्या क्षयी अर्थव्यवस्थेला मुक्तीचे पौष्टिक खाद्य भरवण्याचा तेरा वर्षांतल्या प्रयत्नांत काही पाश्चात्त्य देश किंवा कंपन्यांची हालत सुधारलीय. तशीच काही राजकारणी व काही उद्योगी (आणि उचापती) लोकांच्या श्रीमंतीत नेत्रदीपक प्रगती झालीय खरी!
आज गांधीवादी आर्थिक, सामाजिक समीकरणे (सोशिओ इकॉनॉमिक इक्वेशन्स) शेजारच्या बांगला देशात (आवश्यक बदलासह) स्वीकारली जातात. त्यांना प्रगतीची नवी वाट मिळते. दक्षिण अमेरिकन देशांत मान्य होतात. पण... पिकते तिथे विकत नाही हेच खरे.
देशकाल परिस्थिती बदलत असेलही, पण सामाजिक मानसिकता ही सहजासहजी बदलत नाही. लाख दुखों की एक दवा म्हणून वापरलेली मुक्त अर्थव्यवस्था भारतात यशस्वी ठरणे अशक्य आहे. कारण गांधी विचारधारेप्रमाणे यांच्यात मुळी अंत्योदयाचा विचार नाही तर बळी तो कान पिळी (सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट) ही संकल्पना आहे. भारतीय समाज मुळात धर्म, जात, भाषा, परंपरा वगैरेंनी विभाजित आहे. त्यात अर्धशिक्षित, अंधश्रद्ध, आळशी, दैववादी वगैरे आहेत. त्यात आपल्या देशाच्या परिस्थितीचा अभ्यास न करता इतर ठिकाणचे तोडगे वापरण्याची घाई, अनिश्चित व धरसोडीचे धोरण, एकवार निश्चित केलेल्या धोरणाचा पाठपुरावा करण्याचे धैर्य नसणे, लोकांना बरोबर घेऊन जाण्याच्या कसबाचा अभाव, शासक, शासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना आपण काय व कशासाठी करतो आहोत याची स्पष्ट कल्पना नसणे (सत्ता, मोह व स्वार्थसाधना सोडून इतर कल्पना त्यांनाही नकोच असतात) वगैरे अनेक कारणे तर आहेतच, पण सत्तालोभ्यांनी दुर्लक्ष केलेला लोकसंख्येचा स्फोट आणि मतसंख्येच्या वाढीसाठी परदेशी लोकांचे लोंढे ही महत्त्वाची कारणे आहेतच.
गांधींचा कुटुंब नियोजनाला विरोध होता असा मूर्ख समज त्यांच्या अनुयायांमध्ये आहे. त्यांचा विरोध कृत्रिम उपायांनी नियोजन करण्याला होता. पण विवेकाने कुटुंबनियोजन किती व कसे अवघड नव्हे अशक्यप्राय आहे याचा प्रयोगांती अनुभव त्यांना झाला होताच. असे करू शकणारा जयप्रकाश नारायणांसारखा पुरुष अतिविरळा. त्यामुळे ते अधिक काळ जगते तर याविषयी आपले मनपरिवर्तन झाल्याचे कबूल करण्याइतके ते सत्यवादी होते. पण सरकारने खर्च केलेल्या अब्जावधी रुपयांचा किती उपयोग झाला? धरसोड, ठामपणे राबवण्यासाठी लागणार्या निश्चयाचा व धैर्याचा अभाव वगैरेंमुळे बहुतेक सरकारी योजना अशाच असून अडचण आणि नसून खोळंबा बनल्या आहेत.
इंग्रज सरकार एका सुसूत्र धोरणाने राज्यकारभार करीत होते. प्रजेला सतत अवलंबून ठेवायचे, लाचार बनवायचे, शासक दाता आणि प्रजा याचक असे नाते ठेवायचे. पण लोकशाहीत याच्या विरुद्ध प्रकार असतो. निदान असायला हवा. त्यासाठी गांधीजींनी लोकशिक्षणातून लोकसहभाग मिळवला होता. निदान स्वातंत्र्यलढ्यापुरता तरी.
.(सौ: नवप्रभा Published on: October 1, 2012)
गांधी आणि भारत यांत मला तरी साम्यवाद दिसला नाही.
ReplyDeleteइंग्रज चे कॉंग्रेज झाले एव्हढेच दिसते. इंग्रज हुकूमत अजुनही आहे असे वाटते. फक्त कपडे बदललेत.
धन्यवाद.
या देशातील प्रजा व सत्ताधारी सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख आपण लिहिला ,तो अगदी अंत:करणा पासून ! यातील शब्दन शब्द नुसता वाचून नाही , तर त्यातील गर्भितार्थ उमजून आचरणात आणायलाच हवा . महात्मा गांधी या महात्म्याचे ,महानपण कशात होते ,हे आपण या अप्रतिम व बोधपूर्ण लेखात सांगितले आहे . मन:पूर्वक धन्यवाद शरदजी !
ReplyDeletenice article
ReplyDeleteAn in-depth and lucid analysis of the issues involved!
ReplyDeleteअप्रतिम लेख ...पक्षविरहित भ्रष्टाचारमुक्त शासन ,जातिभेद मिटवण्यासाठी सामाजिक मतपरिवर्तन ,स्वयंपूर्ण स्वच्छ खेडी ,कार्यक्षम तरुण पिढी ,ही फक्त त्यांची स्वप्नं नव्हती.. भारताच्या महासत्ता बनण्याच्या दिशेने आखून दिलेली ती रूपरेषा होती .गांधीना त्यांच्या राजकीय वारसानीच संपवले ...
ReplyDeleteरामभाऊ ,गांधी म्हणजे काँग्रेस नाही हो ....गंमत सांगू... गांधीना काँग्रेसचे सदस्यत्व देण्यास त्यावेळच्या कांग्रेस सदस्यांचा विरोध होता ....विनोबानी तसं लिहून ठेवलंय ,गांधी काँग्रेसचे कट्टर टीकाकार होते . काँग्रेस विसर्जित करा .आता गरज नाही असाच त्यानी सल्ला दिला होता .ते समाजात जास्त वावरले. सामाजिक परिवर्तनावरच त्यांचा भर होता स्वच्छता ,स्वयंपूर्णपणा .नैसर्गिक कुटुंब नियोजन, आरोग्य ,शिक्षण ,शेतकऱ्याच्यासाठीचे धोरण ,स्वच्छ पाण्याचे नियोजन ,मुलांवर संस्कार याबद्दलची मतं त्यानी फक्च तोंडीच सांगितली नाहीत तर लेखीही लिहून ठेवली .गांधी विकृत स्वरूपात जाणीवपूर्वक तोंडी आणि लेखी स्वरूपात पसरवले गेले हे दुर्दैव .
ReplyDeleteस्वातीजी, गांधींचा लेबल लावून आम्हाला फसवले जातेय. हे आमचे दुर्दैव !
ReplyDeleteधन्यवाद.
"जगात एक सार्वत्रिक गैरसमज आहे की म. गांधींनी निःशस्त्र लढा देऊन स्वातंत्र्य मिळवलं. ही समजूत साफ चूक आहे. त्यांची शस्त्रे अभिनव आणि व्यूहरचना (रणनीती) अभूतपूर्व होती.
ReplyDelete"गांधींनी या युद्धात वापरलेली तीन शस्त्रे म्हणजे झाडू, चरखा आणि सत्याग्रह"
हे विचार अंतर्मुख व्हायला भाग पडणारे आहेत.
ग्रामस्वराज्य ही कल्पना आजही प्रत्यक्षात आणली तर टेक्नोलॉजी आणि शेती हातात हात घालून विकासाची वाटचाल करतील हे सत्य आहे . परंतु दुर्दैवाने त्यांचे नाव वापरून, आता तर तेही गरजेचे राहिले नाही, त्यांचा चेहरा छापलेला कागद पुरेसा होतो, आपले राजकारणी देश विकायला निघालेले आहेत. आपण अत्यंत विश्लेषक पद्धतीने त्यांच्या ध्येय धोरणांचा परामर्श घेतला आहे. द्यावेत तेवढे धन्यवाद थोडके
ReplyDelete