Pages

December 10, 2012

मी इतकं केलं तरी...

परवा घरात आमचं जोरदार भांडण झालं. तुम्ही म्हणाल हत्तीच्यात्ती, त्यात काय? घरोघरी अधूनमधून ते होतंच. पण तसं नाही. भांडण सांगायचा हेतू नाही. कोणता अनुभवी (अन त्यामुळंच शहाणा) नवरा असली गोष्ट चार लोकांत सांगायचं धजेल बरं! ‘मान सांगावा जनांत’ ही म्हण साऱ्यांना माहित असेलच की! पण ते असो-  भांडणाचा समारोप (नेहेमी प्रमाणे) सौ.नेच केला. ती म्हणाली, ‘मी साऱ्यांसाठी इतकं केलं तरी....
तिच्या एवढ्या शब्दांनी मागं हेच शब्द ऐकलेले अनेक प्रसंग आठवले. आपल्याकडे सारे दुर्लक्ष करतात या तक्रारीचे पाढे वाचणारे नातेवाईक, आयुष्यभर व्रत घेतल्यासारखे ज्ञानदान करणारे माझे वृद्ध शिक्षक मित्र,निवृत्तीच्या उंबरठ्यावरचा व आणखी मुदतवाढीची इच्छा असलेला माझा मित्र...आणखी किती तरी.....
अनेक वेळा, अनेक ठिकाणी, अनेक विषयांवरची संभाषणे हेच पालुपद आळवीत होती. पण बायकोच्या बोलण्यानं मनात विचारांचं वादळ उठलं. तसं पहिलं तर जन्मलेला प्राणिमात्र दुसऱ्यासाठी काही ना काही करतोच.  सहवासात आल्यावर करणं भागच असत. कधी प्रेमापोटी किंवा कर्तव्यापोटी, कधी वात्सल्यापोटी, कधी मोठेपणाच्या हौसेपोटी.
प्रत्येक जण दुसऱ्यासाठी काहीतरी करतोच. पण हे ‘करणं’ निर्हेतुक असतं का? त्या ‘करण्या’मागं काही तरी ‘हेतू’ असतोच ना? मनात कुठंतरी जमा खर्च नसतो का?
यावेळी उपनिषदातली याज्ञवल्क्य ऋषींची गोष्ट मला स्मरली. मुनी वृद्ध झाले. त्यांना सन्यास घेण्याची इच्छा झाली. त्यांना दोन बायका (जुनी मंडळी धाडसी खरी!) आपली संपत्ती त्यांनी दोघीत वाटायचे ठरवले. तशी विचारणा केली. 
थोरली म्हणाली ‘मी पतीबरोबर खूप सुखोपभोग घेतलेत, आता धाकातीलाच हवं ते घेवू दे.’  तर धाकटी म्हणाली ‘त्या जेष्ठ मोठेपणामुळे पहिला हक्क त्यांचा.  त्यांना जे हवं ते त्यांनी आधी घेवू द्यात (एवढ्या शहाण्या बायका असताना संन्यासाची दुर्बुद्धी का बरं व्हावी?) अखेर धाकटीनं मागावं असं ठरलं.
‘मला नको तुमचा जमीन जुमला, तुमचं गोधन. तुम्ही ब्रम्हज्ञानी आहात. मला तुमच्या ज्ञानात वाटा द्या. धाकटीनं मागणी केली..
टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करूनही याज्ञवल्क्याला ज्ञान दान करावं लागलं. त्यांनं प्रथमच सांगितलं... अरेsss.. अत्मानस्तु कामाय सर्व वस्तू प्रियं भवतिI’ ब्राम्हज्ञानाची ही पहिली पायरी. कोणतीही व्यक्ती वा वस्तू आपल्याला प्रिय असते ती तिच्याशी असलेल्या ममत्वाच्या, माझेपणाच्या संबंधामुळे; वस्तू वा व्यक्तीच्या आंतरिक गुणामुळे नव्हे.  थोडक्यात आपला तो बाब्या. ब्रह्मज्ञानाची ही पहिली पायरी. ‘मी, माझं, मला’ हे अज्ञानाचं मूळ आणि ते उमजणं ही पहिली पायरी.
याचा थोडक्यात आर्थ असा कि,माणूस जे जे करतो त्यामागं  मनात कळत-नकळत काही जमाखर्च, कसली तरी अपेक्षा, काहीतरी हेतू असतोच.मग तो उदात्त असो की स्वार्थी.
अगदी थोर लोकसेवकांच्या मनातसुद्धा स्वत:च्या मनाचं समाधान हा तरी हेतू असतो. एखाद्या अपवादाने हा नियम काही मोडणार नाही.
विसाव्या शतकात मी पाहिलेल्या अनेक धर्मवीर, कर्मवीर वागेरेंची भाराऊन ध्येयामागे झोकून दिलेली बेभान अवस्था व त्या नंतर अखेरची वैफल्यग्रस्त अवस्था मी पाहिलीय. लोकसेवाकांचे मातीचे पाय पाहिले.
म्हणजे अपेक्षेविना कुणी कुणासाठी काहीच करत नाही. आणि अपेक्षा व प्राप्तीचा मेळ कुणाच्यातरी आयुष्यात कधी बसलाय का ? म्हणजे एकूण अपेक्षांचं फलीत काय तर ‘मी सगळ्यांसाठी इतकं  केलं तरीI’
गौतम बुद्धानं ‘जम्म दुख्खं, जरा दुक्खम्, दुक्खम् मरणादपि’ असं म्हटलंय.जन्म-मरण, वृद्धत्व वगैरेला दु:खाचं मूळ कारण मानणाऱ्या बुद्धानं आयुष्य जरा अधिक भोगलं असतं तर.....अपेक्षा हेच सर्व दु:खाचं मूळ असं तो म्हणाला असता.
कृष्णानं गीतेत म्हटलंय, ‘कर्मण्ये वाsधिकारस्ते मा फलेषु कदाचन...’माणसाच्या दु:खचं मूळ नाहीसं करण्यासाठी फळाची अशा सोडून कर्म करायला त्यांनं सांगितलंय.
‘मी इतकं केलं...’ तरी हाच तर कृष्णाचा संदेश. होय ना ?

(सौ: नवप्रभा)

No comments:

Post a Comment