Pages

November 25, 2011

सल्ला

'शेअर्स मधे नकोच गुंतवू. त्यातून काही खरं नाही. एकदा बिग बुल घुसला तर होत्याचं नव्हतं व्हायचं......'
'या जगात कुणी कुणाचा नाही बघ...'
'मी सांगतो, ऎक माझं.....अरे  अनुभवाचे बोल आहेत राजा....'
अरे नको जाऊ सरकारी इस्पितळात मृत्यूचे संपले झालेत ते...मी नेतो तुला...'
घरी दारी या 'मी सांगतो, 'आणि अनुभावाचे बोल यांच्या लाटा आपल्या  कानी  कपाळी सतत आदळत असतात. कधीही, कुठंही, कुणीतरी दुसऱ्याला कसला तरी सल्ला देत असतोच. 
या भडकत्या महागाईत सहज अनाहूत आणि फुकटात भरपूर मिळणारी गोष्ट म्हणजे सल्ला. वय, अनुभव, विषय एवढेच नव्हे तर स्थळ काळाचं ही मुक्तपणे दिला जातो तो सल्लाच. देणारा हौसेनं देतो फक्त सल्लाच देतो तो ही न मागता. अगदी माझी छोटी नातवंडं सुद्धा याबाबतीत मागे नाहीत. 
खरं म्हणजे माणूस हा प्राणी स्वार्थी. प्रत्येकजण आपल्या मनाशी देण्या घेण्याचा ताळेबंद मांडत असतो. प्रत्येक संबंधात आणि ते ही क्षणोक्षणी. तरीही सारा ताळेबंद आणि स्वार्थ विसरून तो एकच गोष्ट मोकळ्या मानाने आणि उदार हस्ते देतो तो म्हणजे सल्ला.
भारत सारा परावलंबी. भारतचं भवितव्य घराणेशाहीवर, समाजाचं भलं नेत्यावर, विकास सरकारवर तर पिकं पावसावर अवलंबून असतात. इथं आमचं आणि आडमाप फक्त दोनच पिकं येतात. एक म्हणजे अमेरीकनांकडून मिळालेलं कॉंग्रेस गवत आणि गाजर गवत. दुसरं फुकट फौजदारी करणाऱ्या हौशी सल्लागाराचं स्वातंत्र्योत्तर काळात तर हे पिकं फारच तरारलं.  अखंड नामसप्ताःच्या निष्ठेनं ते आपलं काम करत असतात. तरी परिणाम ...शून्यच.
असं का बरं व्हावं?
एक तर त्या सल्लागारांना ते सांगतात त्या विषयाचं काडीमात्र ज्ञान नसतं. त्या सांगण्याला ना गांभीर्य ना वजन. शिवाय सल्ला हा एरंडेलासारखा असतो. दुसऱ्याला द्यायला अगदी सोपा घ्यायला मात्र अतिकठीण आणि पचवायला अश्यक्य. त्यामुळे सतत चलनात असूनही त्याची किंमत मात्र शून्यच. 
यावरून तुकाराम महाराजांची गोष्ट आठवली. एक बाई महाराजांकडे आपल्या हट्टी मुलाला घेऊन आली. तो मुलगा गोडधाशा होता. सारखा गुळ खाई. त्याचं पोट महणजे जंतांच माहेरघर झालं होतं. हात पाय काड्या आणि पोट वाढ्या असं त्याचं रूप होतं. 
घरी मारझोड करून, डागण्या देऊन पाहिलं. काही उपयोग झाला नाही. तुकाराम महाराजांनी सांगून तरी काही उपयोग होईल या श्रद्धेने ती आली होती.
तुकाराम महाराजांनी जर विचार केला आणि त्याला घेऊन पौर्णिमेला यायला सांगितलं. 
पौर्णिमेला  बाई मुलाला घेऊन आली. महाराजांनी मुलाला जवळ बसवून घेतलं. त्याच्या पाठीवर हात फिरवत, प्रेमळ स्वरात ते म्हणाले, बाळा, गूळ गोड लागला तरी जास्त खाऊ नये. अति तिथं माती. या पुढे सारखा सारखा गूळ खाऊ नको हं. वाईट असतं ते शरीराला. मग आशीर्वाद देऊन त्याला जायला सांगितलं. 
चारच  दिवसांनी ती बाई परत आली. परत परत पाया पडून मुलात झालेल्या सुधारणेबद्दल तुकारामांचे आभार मानले. एवढं हट्टी पोरगं नुसतं सांगून ऐकलं म्हणजे केवढा चमत्कार!
बाई  गेल्यावर बरोबरीचे लोक या चामत्काराबद्दल त्याचं अभिनंदन करू लागले. 
तुकोबा म्हणाले कसला आलाय चमत्कार? गोड मलाही अतिप्रिय. मी ही वरचेवर गूळ खात असे. मग पोराला कोणत्या अधिकाराने सांगू? परोपदेशे  पांडित्याचा उपयोग वा परिणाम शून्यच. मग विठोबाच्या साक्षीनं गूळ सोडायचा मनोमन निश्चय मी केला. सारे गोड धोड कायमचे सोडले. मगच त्या पोराला सांगितलं. विठ्ठोबानं त्याला सद्द्बुद्धी दिली.
तरुणाईला सल्ला देणारे बुद्रुक, जनतेला सल्ला देणारे नेते, किंवा जगाच्या कल्याणाचा वसा घेऊन घसाफोड करणारे महंत वगैरे लोकांना तुकोबाची गोष्ट माहित नसावी का? कि...... ते असो.
मित्र हो गेली अनेक वर्षे मी असा सल्लागार शोधतोय. तुम्हाला भेटला तर मलाही भेटवाल का .....प्ली s s s ज....

14 comments:

  1. सुरेख शब्दचित्र .....अन ..'' मित्र हो गेली अनेक वर्षे मी असा सल्लागार शोधतोय. तुम्हाला भेटला तर मलाही भेटवाल का ....'' हे अगदी मनातलं वाक्य ...

    ReplyDelete
  2. करून पहिल्या शिवाय सांगू नये आणि काहींचे सल्ले फुकटात पण घेऊ नये

    ReplyDelete
  3. अंधवीश्वास सध्या हॊलसेलमध्ये वीकला जातॊ आहे.

    ReplyDelete
  4. सखी तुझीNovember 26, 2011 at 11:51 AM

    आचार.... मग विचार ....आणि सल्ला हे समीकरण खरे ...

    ReplyDelete
  5. सल्ला देणारी बरीच मंडळी असतात...
    लोका सांगे ब्रम्हज्ञान ..स्वत: कोरडा पाषाण ...

    ReplyDelete
  6. स्वाती ठकारNovember 26, 2011 at 11:52 AM

    मी म्हणून तुम्हाला सल्ला देतेय इतकं झकास लिहून ,लोक प्रबोधन करून काही म्हणजे काही होणार नाही हो ....सग्गळं पालथ्या घड्यावर पाणी बरं का .....लोकांचं म्हणजे कसं असतं बघा पुढचं पाठ मागचं सपाट ...☺☺☺☺☺☺☺

    ReplyDelete
  7. सल्ला देण्यापेक्षा समांतर भलेबुरे अनुभव सांगावेत ,ते ऐकणार्याला निर्णय घेण्यासाठी अधिक कामाचे ठरतात.

    ReplyDelete
  8. सल्ला फुकटचा घेवू नये! अनुभव विचारावेत! त्यातून आपल्या ज्ञानात भर पडते. निर्णय केंव्हाही स्व क्षमतेवरच घ्यावा ! गूळ गोड लागला म्हणून खात राहू नये! अगदी बरोबर! बोधपूर्ण लेख ! शुभदिन!

    ReplyDelete
  9. ऐकावे जनाचे करावे मनाचे...मग तो सल्ला जरी असला तरी आपण योग्य तो विचार करून कृती करावी.

    ReplyDelete
  10. khup chan sharadji

    ReplyDelete
  11. i have same thoughts n ideology...

    ReplyDelete
  12. आणी हल्ली शेअर्स मध्ये खूप विश्वासघातकी माणसे आहेत...तोरण टाइप.

    ReplyDelete
  13. @ शाशंक पेंडसे...अंधवीश्वास सध्या हॊलसेलमध्ये वीकला जातॊ आहे. आणी त्याचा गैरफायदा तोरण सारखे ग्रुप्स घेत आहेत.

    ReplyDelete
  14. ahik sukhat jast ramraman hot asava.

    ReplyDelete